तळमळ… माझी अन् तिची…

आज चौथा दिवस. तिचे सकाळपासून नुस्ते फोन कॉल्स येतायेत. हे सलग असं तीन दिवसांपासून सुरुय. फोन नाही घेत म्हणून मॅसेज करतीये. माझं काही चुकलंय का, का रागावलास ?? असे मॅसेज ती पाठवतीये. सॉरीचे 50-60 मॅसेजस येऊन गेलेत. पण, मी तिला एक साधा मॅसेज पण नाही केला आणि फोन ही.

कॉलेजात असतांना मी तिच्या मागे पुढे फिरायचो. ती जिथं जाईल, तिथं मी जात होतो. माझे लेक्चर्स झाल्यानंतरही मी खास तिच्यासाठी दिवस-दिवसभर थांबयचो. मला ती पहिल्या भेटीतच आवडली होती. तीच दिसणं, राहणं, मैत्रणींशी वागणं हे सगळंच मला भावलेलं. मग तिच्यासाठी बरेच जुगाड करायला लागले. नेहमी तिच्या डोळ्यांसमोर राहणं. असं कित्येक दिवस सुरु होत. एकदा मित्राने सांगितलं, जा तिच्याशी बोल. पण माझं धाडस काही होत नव्हतं.

कारण इतके दिवस मी तिच्यासाठी केलं, ते तिला मान्य नसेल तर, तीच्या मनात जर दुसरा कुणीतरी असला मग. मनात सगळा विचारांचा गोंधळ सुरु होता. पण, मी धाडस करून तिला विचारलंच. तीची काहीच प्रतिक्रिया नव्हती. तिने सहज मान डोलावली अन लगेच निघाली. काहीच प्रतिक्रिया न देता. साधं चेहऱ्यावर एक एक्सप्रेशन हि नव्हतं. मी जरा घाबरलोच होतो. म्हणलं उद्या नाहक कोणाला मला तुडवायला घेऊन यायची, पण असो. मी सगळ्या परिणामांना तयार होतो. तरीही मी दोन दिवस कॉलेजात फिरकलोच नाही.

तिने माझा नंबर कसा मिळवला कुणास ठाऊक. तिसऱ्या दिवशी तिचाच मला फोन आला. मला कळतंच नव्हतं, हसावं कि रडावं! तीन दिवसांपासून कॉलेजात दिसत नाहीयेस, आजारी वैगेरे आहेस का अशी विचारपूस तीनं केली. मी म्हणलं जरा कामानिमित्त नाशिकला आलोय. आज परततो; उद्या येईन कॉलेजला.

तिच्या बोलण्यावरून माझ्या प्रश्नाला होकार असल्याचं वाटतं होत. मग काय नुस्ते ‘मन मी लड्डू फुटा.’ तिलाही मी आवडायला लागलो होतो. त्यामुळं आमचं फोनवर बोलणं, मॅसेजस सगळं सुरळीत होतं. पण, चार दिवसांपूर्वी तिच्या मनात माझ्या विषयी काही गैरसमज निर्माण झालेत. त्यामुळे मी तिच्याशी संपर्क साधनच बंद केलय. यावर मी काय करू? अशी सगळी हकीकत सांगून मित्राने माझा सल्ला मागितला आहे.

(फोटो प्रातिनिधीक)

© शिवनंदन बाविस्कर

Blog at WordPress.com.

Up ↑