First blog post

This is your very first post. Click the Edit link to modify or delete it, or start a new post. If you like, use this post to tell readers why you started this blog and what you plan to do with it.

post

Advertisements
Featured post

अंधश्रद्धेपायी हिरावलेलं बालपण!

आपल्या देशातल्या ग्रामीण जीवनात अंधश्रद्धा एवढी ठासून भरलीय की, त्याला कोण बळी पडेल. तसेच कोणाचं त्यात भांडवल केलं जाईल. या गोष्टीचं सोयरसुतक नाही. अंधश्रद्धा ग्रामीण भागातच आहे असं नाही शहरी भागातही आहे. आता मुद्दा फक्त ग्रामीण भागाचा आहे म्हणून…

       काही दिवसांपूर्वी सारंगखेडा यात्रेला गेलो होतो. दत्ताच्या मंदिराबाहेर एक लहान चिमुरडी आणि तिची आजी होती. त्या लहान चिमुरड्या मुलीला लालबुंद रंगाची साडी नेसवलेली. अंगावर फुलांच्या माळा. हातात हिरव्या बांगड्या. कपाळभर कुंकू. अंगकाठी जाड. उंची लहान. तिनं परिधान केलेल्या वेशभूषेवरून ती ‘देवी’ वाटावी, अशी तिला सजवलेली.

        मंदिरात येणारी काही ग्रामीण मंडळी त्या मुलीला पाहून हात जोडीत होती. कारण त्या आजीनं तिला कोवळ्या वयात नको असलेलं ‘देवपण’ लादलेलं. त्यानं ती पूर्णपणे वैतागलेली भासत होती. तिच्याकडे पाहून तिच्या वेदना अन् मनाची घालमेल स्पष्ट दिसत होती. आधीच शरीरयष्टीने झाड, त्यात अंगभर परिधान केलेल्या कापडानी तर तिचा जीव नकोसा नक्कीच झाला असेल. पण, याची कुणाला पर्वा?

       आजीला तिच्या भावनांशी, मनाशी त्यातल्या त्यात बालपणाशी काय घेणं देणं. तिला फक्त त्यातून तिची आर्थिक बाजू दिसत होती. ज्यानं तीच पोट भरण्यास पुरेसं होत. बाकी त्या मुलीचं काही होवो. मनात विचार येतोय की, या अंधश्रद्धेपायी त्या चिमुरडीच्या हिरावलेल्या बालपणाचं काय?

सारंगखेडा.

© शिवनंदन बाविस्कर (बी. शिवनंदन)

…आणि त्या महिलांनी नागासाठी दूध आणलं!

ग्रामीण भागातील लोकं तर लोकं, पण शहरी भागातही एवढी देवभोळी लोकं असतात. हे आज दिसलं. शिवाय चित्रपटात दाखवलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे जसंच्या तसं अनुकरण वास्तव जीवनात करणारे काही लोकंही पाहिले. तसंच प्रत्येक सरपटणारा प्राणी हा आपला शत्रूच असतो, त्यामुळे त्याला मारणं हा न्यूनगंड मनात बाळगणारी दोनचार लोकही होतीच. खरंच ही गंभीर बाब आहे. आणि तीही शहरात…?
              तर झालं असं, आज सकाळी आम्ही ऑफिसला बसलो होतो, ऑफिस म्हणजे दै. सकाळच्या चाळीसगाव विभागीय कार्यालयात. असाच विविध बातम्यांवर विषय रंगला होता. त्यात श्रीकांत भामरे सरांच्या फोनची रिंग वाजली. पलीकडून काय सांगितलं असेल माहीत नाही. पण एकूणच त्यांचा चेहरा पाहून ‘इमर्जन्सी’ असा एक सिग्नल कळून चुकला होता. फोन ठेवताच ते मला म्हणाले, ‘शिवाभाई चल आपल्याला एका ठिकाणी जायचंय.’ मी विचारलं कुठे तर म्हणाले, ‘साप’ पकडायला. मला माहितीये ते सर्पमित्र आहेत. पण तरी मी त्यांना प्रश्नार्थक भावाने विचारलंच, ‘साप पकडायला?’ ते म्हणाले, ‘चल चल लवकर जाऊ.’ मग तसंच धावपळ करत, गाडीला किक मारत निघालो. त्या घराजवळ आम्ही पोचलो.
             पोचलो तेव्हा दोन महिला कसलं तरी काम करत होत्या. शेजारील घराच्या गॅलरीत उभ्या राहून काही महिला सापावर लक्ष ठेवत होत्या. तसंच एक पुरुष लोखंडी गज घेऊन साप घुसलेल्या खड्ड्यात कोरीव काम करत होता.
              भामरे सर आणि मी पोचलो. एक गोष्ट आधीच क्लियर करून देतो. मी नुसतं सरांच्या सोबतीला गेलो होतो. साप वगैरे पकडताना पाहणं हे आपल्यासाठी नवीन नव्हतं. पण, आज बऱ्याच दिवसांनी तो योग आला. त्यामुळे हाताची घडी घालून पाहण्यापलीकडे माझ्या हातात काही नव्हतं. असो.
               साप जिथं लपून बसला होता. ती जागा त्या महिलांनी सरांना दाखवली. त्यानुसार खऱ्या कामकाजाला पुढे प्रारंभ झाला. ज्या माती दगडांच्या आत साप दडून बसला होता. त्या सर्व भागात लाकडी काठीने आणि लोखंडी गजाने तो भाग पिंजून काढला. पण नाही तरी बहाद्दर काही दर्शन देईना. त्यात काही वेळ गेला. मग त्या भागात नळीने पाणी सोडण्याचा विचार झाला. जवळपास दहा मिनिटे त्या जागेत पाणी सोडलं. भामरे सरांनी रॉकेल मागवून त्या पाण्यात रॉकेल टाकलं. त्यामुळे काही काळ निपचित पडून असलेला सापाची जीभ अखेर पाण्याबाहेर चमकली.
               सापाचं तोंड पाहून बर वाटलं. कारण पक्की खात्री झाली की साप इथेच आहे. त्यामुळे पूढील त्याला पकडण्याचं नियोजन सुरू झालं. साप वरती आला आणि तोच त्याने ‘फणा’ काढला. तेव्हा कळाल की, तो साधासुधा बिन विषारी साप नसून नाग आहे नाग. तो पाण्यातून वरती आला आणि एका भिंतीलगतच्या जाळीत स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होता. जो की पूर्णपणे निष्फळ ठरला.
                नागाची शेपूट सरांनी पकडली. पण सहसा हाती लागेल तर तो नाग कसा? त्याने खूप आढेवेढे घेतले. त्यातच तो शेजारच्या घराकडे घुसला. तिथे पाण्याच्या मोटारीच्या आसऱ्याला जाऊन बसला. तिथे काहीवेळ त्याला बाहेर काढण्यासाठी विविध शक्कल लढवल्या. अखेर पठ्ठ्या सरांच्या हातात लागलाच.
                त्याला पकडलेलं पाहून महिलांनी व येणाऱ्या जाणाऱ्यांनी जंगी गर्दीच केली. तिथल्या लोकांनी वातावरण अगदी गजबजून गेलं. मुळात एवढया गर्दी गोंगाटामुळे तो नागही पिशवीत जाईना. काही वेळापूर्वी घाबरणाऱ्या महिलाच सापाला कस पकडायचं ते सांगत होत्या. काही देवभोळ्या महिलांनी तर नागाचे हात जोडून दर्शन घेतले. दर्शन घेणाऱ्या महिलांनी नागाकडे काही मनात मागितलं नसेल हे कशावरून? मागितलं देखील असेल काय सांगता येत, शक्यता आहे. पुढे तर एका महिलेने हाईटच केली. चक्क नागासाठी एका ताटलीत दूध घेऊन आल्या. एका आजीने दूध आणायला लावलं आणि त्या महिलाने जणू भक्तिभावाने ते दूध नागासाठी आणून दिल. माझ्यासोबत असणाऱ्या एकदोन लोकांनी नाग दूध पीत नाही. हे सांगितल्यावरही नागापर्यंत दूध घेऊन जाण्याची त्यांची तयारी दिसली.
              शेवटी भामरे सरांनी त्या महिलेला ‘नाही’ सांगितल्यावर त्या थांबल्या. काही जण तर त्याला मारा असंही म्हणत होते. अखेर नाग त्या पिशवीत घुसला आणि सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
(फोटो प्रातिनिधिक)
 
© शिवनंदन बाविस्कर

गणेशोत्सवातील ‘हलगी’ वाजली राज्यभरात

“मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, बोल मैं हलगी बजाऊ क्या…” या गाण्याने यंदाच्या गणेशोत्सवात खूप मोठी धूम केलीय. तरुणाईच्या नसानसात हे गाणं भिनलं होतं… हे गाणं त्यांना आपल्या तालावर थिरकवत होतं… त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच हलगी वाजली…
     दरवर्षी गणेशोत्सवात कुठल्या ना कुठल्या गाण्याची क्रेझ असतेच. जे गाणं गणेशोत्सवात हिट होतं. ते पुढं वर्षभर जोरात चालतं. आणि लग्नसराईमध्ये तर या गाण्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं जातं. तुम्ही अलीकडची काही वर्षे मागे जाऊन बघाल तर, तुमच्या सहज लक्षात येईल.
     2015 मध्ये ”शांताबाई sss…” या गाण्यानं याड लावलं होत. प्रत्येक शहराच्या चौकाचौकात व प्रत्येक गावातल्या गल्लोगल्लीत हे गाणं ऐकायला मिळालं.
     2016 मध्ये “कल्लूळाच पाणी कशाला ढवळीलं…” या गाण्यानं तर अवघी तरुणाई ढवळून निघाली होती. शिवाय गेल्या लग्नसराईत या गाण्याची मोठी चलती होती.
     2017 मध्ये म्हणजे चालू वर्षात “बोल मैं हलगी बजाऊ क्या…” या गाण्याने तर जणू अख्खा महाराष्ट्रच हँग केलाय. शहराबरोबरच खेड्यापाड्यात देखील हे गाणं गणेशोत्सवात खूप चाललं. गाण्यात मराठी मिश्रित हिंदी भाषा वापरली गेलीय. गाणं ऐकायला जरी खोडकर असलं, तरी चाल आणि ठेका भुरळ घालतो. याच काय त्या कारणांमुळे हे गाणं तरुणांनी डोक्यावर घेतलेलं पाहायला आणि ऐकायला मिळालंय.
     आपलं गाणं गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर चालावं; हा उद्देश मनात ठेवत अनेक म्युझिक कंपन्या, म्युझिक डायरेक्टर, गायक गाणं तयार करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करतात. सगळ्यांचाच प्रयत्न यशस्वी ठरतो, असेही काही नाही. कोणतं गाणं तरुणाईच्या पसंतीला उतरू शकतं; हे सांगणं तस कठीणच.  त्यामुळं ज्यांचं गाणं तरुणांना आवडलं ते ‘हिट’ झालं, असं सोप्प सरळ गणित आहे. मग त्यातले शब्द, चाली तसेच गाण्यातला पारंपरिकपणा तसेच शास्त्रशुद्ध गाणं हा भाग गौण असतो.
     पुण्यात तर जुनी गाणी नव्यानं कव्हर करून वाजवली गेली. त्यात “हमे तुमसे प्यार कितना” या गाण्यावर अक्षरशः ‘झिंगाट’ गाण्याप्रमाणे नाचल गेलं. शिवाय “आला बाबुराव” या गाण्याची देखील धूम होती.
     यंदाच्या गणेशोत्सवात वाजलेली ‘हलगी’ आता वर्षभर लग्नसराईच्या रूपाने सगळ्यांना ऐकू येणार, यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे लग्नसराईत या गाण्यावर ठेका धरायला तुम्ही पण तयार असाल. हे निश्चित.
 
 
© शिवनंदन बाविस्कर

तळमळ… माझी अन् तिची…

आज चौथा दिवस. तिचे सकाळपासून नुस्ते फोन कॉल्स येतायेत. हे सलग असं तीन दिवसांपासून सुरुय. फोन नाही घेत म्हणून मॅसेज करतीये. माझं काही चुकलंय का, का रागावलास ?? असे मॅसेज ती पाठवतीये. सॉरीचे 50-60 मॅसेजस येऊन गेलेत. पण, मी तिला एक साधा मॅसेज पण नाही केला आणि फोन ही.

कॉलेजात असतांना मी तिच्या मागे पुढे फिरायचो. ती जिथं जाईल, तिथं मी जात होतो. माझे लेक्चर्स झाल्यानंतरही मी खास तिच्यासाठी दिवस-दिवसभर थांबयचो. मला ती पहिल्या भेटीतच आवडली होती. तीच दिसणं, राहणं, मैत्रणींशी वागणं हे सगळंच मला भावलेलं. मग तिच्यासाठी बरेच जुगाड करायला लागले. नेहमी तिच्या डोळ्यांसमोर राहणं. असं कित्येक दिवस सुरु होत. एकदा मित्राने सांगितलं, जा तिच्याशी बोल. पण माझं धाडस काही होत नव्हतं.

कारण इतके दिवस मी तिच्यासाठी केलं, ते तिला मान्य नसेल तर, तीच्या मनात जर दुसरा कुणीतरी असला मग. मनात सगळा विचारांचा गोंधळ सुरु होता. पण, मी धाडस करून तिला विचारलंच. तीची काहीच प्रतिक्रिया नव्हती. तिने सहज मान डोलावली अन लगेच निघाली. काहीच प्रतिक्रिया न देता. साधं चेहऱ्यावर एक एक्सप्रेशन हि नव्हतं. मी जरा घाबरलोच होतो. म्हणलं उद्या नाहक कोणाला मला तुडवायला घेऊन यायची, पण असो. मी सगळ्या परिणामांना तयार होतो. तरीही मी दोन दिवस कॉलेजात फिरकलोच नाही.

तिने माझा नंबर कसा मिळवला कुणास ठाऊक. तिसऱ्या दिवशी तिचाच मला फोन आला. मला कळतंच नव्हतं, हसावं कि रडावं! तीन दिवसांपासून कॉलेजात दिसत नाहीयेस, आजारी वैगेरे आहेस का अशी विचारपूस तीनं केली. मी म्हणलं जरा कामानिमित्त नाशिकला आलोय. आज परततो; उद्या येईन कॉलेजला.

तिच्या बोलण्यावरून माझ्या प्रश्नाला होकार असल्याचं वाटतं होत. मग काय नुस्ते ‘मन मी लड्डू फुटा.’ तिलाही मी आवडायला लागलो होतो. त्यामुळं आमचं फोनवर बोलणं, मॅसेजस सगळं सुरळीत होतं. पण, चार दिवसांपूर्वी तिच्या मनात माझ्या विषयी काही गैरसमज निर्माण झालेत. त्यामुळे मी तिच्याशी संपर्क साधनच बंद केलय. यावर मी काय करू? अशी सगळी हकीकत सांगून मित्राने माझा सल्ला मागितला आहे.

(फोटो प्रातिनिधीक)

© शिवनंदन बाविस्कर

गजबजलेल्या एकांतवासाची अनेक वर्षे!

त्याच जागी, त्याच रोजच्या रहाटगाड्यात वर्षानुवर्षे बसून राहणं तुम्हाला शक्यय? तर अजिबातच नाही. ते तुम्हाला, मला किंवा आणखी कुणालाच शक्य नाही. मात्र गेली कैक वर्षे हा माणुस त्याच रोजच्या दुनियादारीत हरवून गेलाय. स्वतःच्याच आयुष्याशी झगडत तो आजही जगतोय…

ही गोष्ट आहे चाळीसगावच्या पुलाखाली अनेक वर्षांपासून पडून असलेल्या सुदाम खंडू साळुंखे यांची. साठ वर्षे वय असलेला हा माणूस आहे तशाच अवस्थेत बावीस वर्षांहून अधिक काळापासून येथे पडून आहे. असे पुलाशेजारी राहणारे काका सांगत होते.

2010 आणि 2011 या वर्षात अकरावी, बारावीला असतांना आमची क्लासेससाठी याच मार्गाने ये-जा असायची. तेव्हापासून आम्ही त्यांना पाहात आलोय. पण त्यावेळी असेल कुणीतरी असं म्हणून दुर्लक्ष केलं.

एकदा आमच्या क्लासच्या सरांनी याच माणसाबद्दल थोडी माहिती सांगितली; ती भयानकच वाटली. ऐकुन आश्चर्य वाटलं. पण त्यांच्यावर हि परिस्थिती का आलीय. हे मात्र कुणाकडून नीटसं कळालं नाही. तर तो व्यक्ती ग्रॅज्युएट आहे. चाळीसगावच्या नारायणवाडीत सुदाम यांच घर आहे. त्यांचा मोठा भाऊ सरकारी नोकरीत चांगल्या हुद्द्यावर होता. मात्र त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे त्याला नोकरीवरुन काढण्यात आलं. त्यामुळे तो आता मोल मजुरी करतोय. सुदामचे वडील रेल्वेत खाद्यपदार्थांची विक्री करत तेथेच कामाला होते.

 
सुदाम यांच्यावर काही मानसिक परिणाम झाला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे तेव्हापासून पुलाखालीच बसून आहेत(फोटोत दिल्याप्रमाणे). कुणाशी एका शब्दाने बोलणं नाही, की कुणाला त्रास देणं नाही. आसपासचे लोक ताज अन्न रोज आणून देणार. तसेच येणारे जाणारे स्वतःकडे असलेलं काही खायला टाकुन जाणार, तेवढंच खाणार. तिथे जवळच असलेला चहावाला जेव्हा तेथून जातो, तेव्हा त्यांना चहा टाकून जातो. पावसाळ्यात पाण्यापासून बचावासाठी गायी, कुत्रे, डुक्करे असे प्राणी पुलाखाली येऊन बसतात. पण या प्राण्यांकडून त्यांना काडीचीही इजा होत नाही. याउलट गायी त्यांच्या अंगाला चाटतात.

 
सर्व्हिसींग सेंटरवर असलेले कर्मचारी महिन्यातून त्यांची एकदा अंघोळ घालुन देतात. न्हावी त्यांचे केस कापून देतो. फ्लॅट किंवा मोठमोठाल्या बंगल्यामध्ये राहणार्या बड्या लोकांना कुठला ना कुठला आजार व रोग सहज होतो. मात्र हे गेल्या कैक वर्षांपासून तेथे आहे तसेच पडून आहेत; यांना मात्र कुठलाच आजार ना रोग झाला नाही. हे सुद्धा तेवढेच विचार करायला लावणारे आहे. गजबजलेल्या एकांतवासाची हि त्यांची अनेक वर्षे आणखी किती काळ त्यांना जगावी लागणारेत हे मात्र विचारांपलिकडचे आहे.

 © शिवनंदन बाविस्कर

(सुदाम यांच्या बद्दलची माहिती प्रत्यक्ष त्यांच्या कुटूंबाकडून नाही तर, पुलाच्या आसपास राहणार्या लोकांकडून घेतली आहे. त्यामुळे त्यात काहीसा बदल असण्याची शक्यता असू शकते.)

Blog at WordPress.com.

Up ↑